नाशिक: ब्रह्माकुमारी संस्थेच्यावतीने स्वच्छता अभियान 

0
244

स्वच्छता हा आरोग्यसंपन्न जीवनाचा महामंत्र : राजयोगिनी ब्रह्माकुमारी पूनम दीदी 

नाशिक,महाराष्ट्र: निरोगी आणि स्वस्थ जीवनासाठी स्वच्छता ही एक चांगली सवय आहे.चांगल्या आरोग्यासाठी व्यक्तिगत,सामूहिक तसेच परिसराची स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे.सर्वात मोठी संपत्ती ही आपले आरोग्य हीच धनसंपत्ती असून आरोग्य असेल तर सर्व काही आहे.दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी स्वच्छतेचा वसा घेणे फार आवश्यक आहे.स्वच्छता म्हणजे पवित्रता, निर्मळता, सुंदरता,आनंद आणि ईश्वर आहे असे प्रतिपादन येथील म्हसरूळ येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्राच्या  राजयोगिनी ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांनी केले.

प्रभू प्रासाद, म्हसरूळ येथील मुख्य सेवा केंद्र ब्रह्माकुमारीज् संस्थेने आयोजित “स्वच्छता हीच सेवा” कार्यक्रमात ब्रह्माकुमारी पूनम दीदी  बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमासाठी नाशिकरोड येथील सेवा केंद्राच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी पारू दीदी,द्वारका सेवा केंद्राच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योती दीदी आदींसह मोठ्या संख्येने ब्रह्माकुमार-ब्रह्माकुमारी परिवार उपस्थित होता.

यावेळी ब्रह्माकुमारी पूनम दीदी म्हणाल्या की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आज ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियान देशभरात राबवले जात आहे त्याचाच एक भाग संस्थेच्या नाशिक जिल्हा मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक तास स्वच्छते’साठी या उपक्रमाची सुरुवात आज ब्रह्माकुमारी संस्थेच्या प्रभू प्रसाद, म्हसरूळ येथून ब्रह्माकुमारी परिवारासमवेत  करण्यात आली आहे.आपल्या घराबरोबरच  परिसर,आपले शहर स्वच्छ राहण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे आले पाहिजेत म्हणजे इतरांनाही प्रेरणा मिळेल.असे ब्रह्मकुमारी पूनम दीदी यांनी यावेळी सांगितले.यावेळी राजयोगिनी ब्रह्माकुमारी पारू दीदी यांनी स्वच्छतेचा अर्थ केवळ परिसर स्वच्छता नाही तर आपण आपले चांगले विचार, चांगले संस्कार,उत्तम आरोग्य तसेच आपली दिनचर्येतील सुसूत्रता आणणे  महत्त्वपूर्ण आहे.तसेच ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांनी दैनंदिन जीवनामध्ये स्वच्छता कायम असली पाहिजेत. आपल्या रोजच्या सवयीमध्ये स्वच्छता अंगीकारली पाहिजेत.आपण कधी स्वच्छतेचा कंटाळा न करता एक आदर्श व जबाबदार नागरिकाच्या रुपाने देशाच्या प्रगतीला हातभार लावू शकतो.

यावेळी नाशिकच्या ब्रह्माकुमारी संस्थेच्या मुख्य सेवा केंद्र प्रभू प्रसाद येथील परिसरामध्ये स्वच्छतेचा कार्यक्रम झाला याप्रसंगी संस्थेच्या ७० ते ८० साधकांनी मिळून श्रमदान करत परिसरातील गवत,प्लॅस्टिक, कागद,कचरा,पालोपाचोळा,रस्त्याच्या कडेला जमा झालेली घाण इत्यादी झाडून परिसर स्वच्छ केला.यावेळी ‘स्वच्छ भारत, निरोगी भारत’ ‘स्वच्छ भारत,सुंदर भारत’ अशाही घोषणा ब्रह्माकुमारी संस्थेच्या साधकांनी दिल्या.

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें